काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पावणेदोन वर्षांनंतर वर्किंग कमिटी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातील ८ जणांची वर्णी लागली आहे. आमदार यशोमती ठाकूर व आमदार प्रणिती शिंदे यांना विशेष निमंत्रित म्हणून संधी मिळाली आहे. प्रणितींना कमी वयात राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाल्याने त्यांची पुढील राजकीय इनिंग दिल्लीतून असणार, अशी चर्चा आहे.
महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या आमदार प्रणिती शिंदे या सर्वांत तरुण आहेत. त्या सध्या ‘सोलापूर मध्य’ या मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच, काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांनी पहिल्यांदा २००९ मध्ये शहर मध्य मतदारसंघ काबीज केला. त्यानंतर त्यांनी मोदी लाटेतही २०१४ व २०१९ मध्ये विजय मिळवून आमदारकीची हॅट्ट्रिक केली.