घरगुती गॅसच्या दर कपानीनंतर आज, शुक्रवारी कमर्शिअल सिलेंडरची किंमत 158 रुपयांनी कमी करण्यात आलीय. सरकारने दोन दिवसांपूर्वी घरगुती एलपीजीच्या दरात 200 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर आता 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात आले आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या मते, आता एलपीजी ग्राहकांना व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1,522 रुपये मोजावे लागतील. कोलकात्यात एलपीजी गॅसची किंमत 1,636 रुपये, मुंबईत 1,482 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,695 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे सरकारने रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी घरगुती गॅसच्या दरात 200 रुपयांची कपात केली होती. त्याच वेळी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी किंमत प्रति सिलिंडर 400 रुपयांनी कमी केली आहे. आयओसीएलच्या वेबसाइटनुसार, गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीही कमी करण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्यातील कपात आणि आजच्या कमी झालेल्या किंमतीनंतर, व्यावसायिक सिलिंडरवर एकूण 250 रुपयांपेक्षा जास्त कपात झाली आहे.