बीड । दि. २४ कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक अनियमिततेवर मात करणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळत आहेत, वातावरण पूरक आणि हवामान आधारित शेतीचे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवर्जून कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी व या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन खा. प्रितमताई मुंडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा बीड द्वारे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. यावेळी मंचावर मा. आ.साहेबराव दरेकर, अक्षय मुंदडा, विजय गोल्हार, सर्जेराव तांदळे, स्वप्नील गलधर, चंद्रकांत फड , जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की ‘देशाच्या अर्थ आणि समाज व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना जपण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. स्वातंत्र्योत्तर काळात ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा शेतकरी आणि सैनिकांच्या सन्मानासाठी देण्यात आली, मात्र शेतकरी आणि सैनिकांचा खऱ्या अर्थाने सन्मान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकारने केला. सैनिकांना आता वन रँक ,वन पेन्शन आणि शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या माध्यमातून सन्मान मिळत असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी यावेळी नमूद केले.
सध्याची शेती ही भौगोलिक परिस्थिती आणि निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना सातत्याने मदतीची गरज भासते. या परिस्थितीवर मात करायची असेल तर आधुनिक आणि वातावरण पूरक शेतीचे धडे देणाऱ्या कृषी प्रदर्शनांची नितांत आवश्यकता असल्याचे प्रितमताई म्हणाल्या. या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाच्या आयोजनासाठी त्यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त करत जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.प्रशासनाने शेतकऱ्यांना एका ठिकानी जमवण्यापेक्षा प्रशासन शेतकऱ्यांच्या दारी घेऊन जाण्याचे नियोजन केले तर ते शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर आणि सोयीस्कर ठरेल असेही त्या यावेळी म्हणाल्या.
समुपदेशन, बँकिंग आणि योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारा
हवामानात सातत्याने होणारे बदल, नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर मदत करण्यापेक्षा त्यांना अडचणीत उपयुक्त ठरणाऱ्या योजना राबविल्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल, त्यामुळे कृषी प्रदर्शनात समुपदेशन, बँकिंग आणि योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात यावेत असा विचार खा.प्रितमताई मुंडे यांनी मांडला. त्यांच्या या अभिनव विचाराला उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कृषी प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, मल्टीपर्पज ग्राऊंड येथे आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, शेती निगडित औजारे खरेदी-विक्री दालन, पशुधन प्रदर्शन, लहान मुलांसाठी फनफेअर, कृषी उत्पादने, हस्तकला प्रदर्शन व विक्री, खाद्य महोत्सव , सेंद्रिय शेतमाल विक्री व प्रदर्शन, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान व प्रमाणीकरण पद्धती मार्गदर्शन, मत्स पालन विषयी मार्गदर्शन, शेतीपूरक जोडधंद्यासाठी मार्गदशन तसेच हवामान आधारित शेती विषयक मार्गदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन हे या कृषी महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.