पुण्यात काही दिवसांपासून कोयता गँगच्या दहशतीत वाढ होताना दिसत आहेत. कोयता गँगमधील अनेकांच्या मुसक्या आवळून देखील कोयता गँगचा हैदोस संपताना दिसत नाहीये. पुण्यात कोयता गँगने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पुण्यात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाला गंभीर जखमी केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरजवळ मैदानावर झोपलेल्या नागरिकावर तरुणांनी कोयत्याने हल्ला केला. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन या तरुणांनी ज्येष्ठ पती-पत्नीवर कोयत्याने खूनी हल्ला केल्याची माहिती आहे. फिर्यादी सतीश काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यांपूर्वी किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी मिळून काल रात्री हल्ला केला.
दाद्या बगाडे, दीपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांवर शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सतीश भीमा काळे हे आपल्या पत्नी आणि मुलाबाळासह शिवाजीनगर भागात एका मैदानावर रात्री झोपले असता टोळक्याने हातात कोयते घेऊन जोरजोरातून हल्ला करुन परिसरात दहशत माजवत कोयता टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात काळे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.