आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) शास्त्रज्ञ आहोत. तसेच चांद्रयान-3चे लँडर मॉड्यूल आपणच डिझाईन केले होते असा खोटा दावा करणाऱ्या इसमाला गुजरात पोलिसांनी अटक केलीय. मितुल त्रिवेदी असे या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात सूरत पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेय.
यासंदर्भातील माहितीनुसार आरोपी मितुल त्रिवेदी इस्त्रोचा शास्त्रज्ञ असल्याचा दावा करीत असे. तसेच चांद्रयान-3 चंद्र मोहिमेसाठी लँडर मॉड्यूल डिझाइन केल्याचे तो लोकांना सांगत होता. या प्रकरणी एका व्यक्तीने पोलिसांकडे या व्यक्तीची वागणूक संशयास्पद असल्याची तक्रार केली होती. याचा पोलिसांनी तपास केला. तपासामध्ये सर्व दावे खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला गुजरातमधील सुरत शहरातून अटक केली. पोलिसांच्या चौकशीत मितुल त्रिवेदीचे सर्व दावे खोटे असल्याची माहिती पुढे आली. आरोपी मितुल त्रिवेदी सुरत शहरातील तो चालवत असलेल्या कोचिंग क्लासेससाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचे दाखवत असे. या व्यक्तीने इस्रोच्या पुढील प्रकल्पामध्ये सदस्य असल्याचे बनावट पत्रही तयार केले होते.
याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त शरद सिंघल यांनी सांगितले की, त्रिवेदी हा खाजगी शिक्षक आहे. तो आपल्या कोचिंग क्लासेसकडे अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी माध्यमांसमोर इस्रोचे शास्त्रज्ञ असल्याचे सांगायचा. आम्ही इस्रोशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, आरोपीने दाखवलेले पत्र प्रथमदर्शनी त्यांनी दिलेले नाही.