सात दशकांपूर्वी भारतातून नामशेष झालेल्या चित्यांनी आता मध्य प्रदेशातील कुनोच्या जंगलात आपले बस्तान बसवले आहे. नामिबियाहून भारतात आणलेल्या या चित्त्यांचा सुरुवातीचा काळ कठीण ठरला. त्यातच, साशा नावाच्या मादी चित्त्याचा मृत्यूच्या वृत्ताने सर्वच हळहळले. पण, जन्म आणि मृत्यूचे चक्र असेच सुरु राहते. साशाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता त्याच जंगलात सियाया या मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. बछडे आणि सियाया सुरक्षित आणि सुदृढ असल्याची माहिती कुनो व्यवस्थापनाने दिली आहे. तर, आशा नावाच्या मादी चित्यालाही नव्या जीवाची चाहूल लागली आहे. प्राणीप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असून नामिबियातील चित्ते आता मध्य प्रदेशातील कुनो जंगलात स्थिरावले असल्याचे स्पष्ट झाले आहे. नामिबियातून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हे चित्ते भारतात आणण्यात आले.
मात्र, सुरुवातीपासूनच किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ‘साशा’ चा मृत्यू झाला. ती साडेचार वर्षांची होती. आता आशा नावाची चार वर्षाच्या मादी चित्ता गर्भवती असून एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ती बछड्यांना जन्म देण्याची शक्यता आहे. चित्त्यांचा गर्भधारणेचा काळ साधारणपणे ९० दिवसांचा असतो. सियायाचे बाळंतपण सुखरूप झाल्यामुळे, तब्बल सात दशकानंतर भारतात चित्त्यांचा जन्म झाला आहे.
वर्ष १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे जाहीर करण्यात आले.दुसऱ्या खंडातून चित्ते आणणे हा भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा एक भाग होता. नामशेष झालेला हा रुबाबदार प्राणी ७० वर्षानंतर भारताच्या जंगलांमधील जीवनसाखळीत सहभागी झाला आहे.. आपल्या देशातील शेवटच्या चित्त्याची वर्ष १९४७ मध्ये सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने शिकार केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर, पाच वर्षांनी म्हणजे १९५२ मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले.