काकाच्या घरी पाळण्यावर एकटी झोका घेत असलेल्या ६ वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने ३० वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड ठोठावला. आहे. प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी हा निकाल दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६ वर्षांच्या मुलीवर आरोपी महेश टेंभुर्णे (३२) याने अत्याचार केला होता. २७ ऑक्टोबर २०२१ ला ती चिमुकली आपल्या घराशेजारी काकाच्या घरी पाळण्यावर एकटी झुलत होती.
आरोपीने तिला एकटी पाहून चॉकलेटचे आमिष देत घरामागे असलेल्या शौचालयाच्या खड्ड्याकडे नेले. चिमुकलीला चॉकलेटकरिता दहा रुपयांची नोट देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर चिमुकली ही घरी रडत रडत आली. तिच्या आईने तिला रडण्याचे कारण विचारता असता तिने घडलेली माहिती दिली. पीडितेच्या आईने पोलिस स्टेशन केशोरी येथे २७ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप इंगळे यांनी केला होता. आरोपीचे वकील व अतिरिक्त सरकारी वकील कैलाश खंडेलवाल यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरुद्ध सरकार पक्षातर्फे सादर साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय अहवाल, इतर कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरून आरोपी महेश टेंभुर्णे (३२) याला ३० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.