छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणारा ख्रिस्ती धर्मगुरू बोलमेक्स परेरा याच्या विरोधात शुक्रवारी रात्री वास्को पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परेराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजपूत करणी सेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती.
यासंदर्भातील माहितीनुसार ख्रिस्ती पादरी बोलमेक्स परेरा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात परेरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करताना दिसून येतो आहे. काही लोकांसाठी शिवाजी महाराज दैवत आहेत. पण माझ्या मते, शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक आहेत. आपण त्यांचा योग्य आदर आणि सन्मान केला पाहिजे. पण ते देव किंवा दैवत नाहीत. यासाठी हिंदू बांधवांशी संवाद साधून त्यांना शिवाजी तुमचा देव आहे की, तुम्ही त्यांच्याकडे राष्ट्रीय नायकाच्या रुपात पाहता ? हे विचारले पाहिजे. ते राष्ट्रपुरुष म्हणून शिवरायांकडे पाहत असतील, तर त्यांना दैवत कसे काय म्हणणार?, असे परेरा या व्हिडिओ म्हणताना दिसून येत आहेत. पदरी परेरा यांच्या या विधानानंतर त्यांच्याविरोधात काणकोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धवू शकतो, असे यासंबंधीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान प्रकरण अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेता पादरी बोलमेक्स परेरा यांनी या प्रकरणी खेद व्यक्त करत आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. कुणीतरी माझ्या प्रवचनातील विशिष्ट भाग समोर आणला. छत्रपती शिवरायांची गणना राष्ट्रपुरुषांत होते. देशच नव्हे तर परदेशांतील लोकांनाही आदरणीय आहेत, असे परेरा यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे.