विकसीत भारत @ २०४७ अंतर्गत जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळ्या विभागाअंतर्गत सात समित्यांचे गठण करण्यात आले असून सदर आराखडा तयारीच्या संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा प्रशासन व पुणे येथील ‘सिंबॉयसीस स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
जिल्हा विकास आराखडा संदर्भात जिल्हा प्रशासन आता ‘सिंम्बॉयसीस स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’सोबत काम करणार आहे. त्यासाठी या विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करत असताना त्याची शाश्वत विकास ध्येयांसोबत सांगड घालणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कृषी आणि संलग्न सेवा, उद्योग, पर्यटन, खनिकर्म इत्यादी विभागांनी कार्य करणे आवश्यक आहे. सोबतच नविकरणीय स्रोतांपासून ऊर्जानिर्मिती, शेतीतील आंतरपीक पध्दत यांवर भर देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. आगामी काळात संबंधित विभागप्रमुखांनी विषयवार बैठका आयोजित कराव्या. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वंकष विकास आराखडा लवकरात लवकर तयार करावा, अशा सुचनाही जिल्हाधिका-यांनी दिल्या. सदरील बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री फेलो सिद्धार्थ देशमुख यांनी सादरीकरण केले.
विकसीत भारत @ २०४७ अंतर्गत सन २०२२-२७, २०२७-३७ आणि २०३७-४७ या वर्षांचा जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करायचा आहे. यासाठी कृषी संलग्न सेवा, खनीकर्म, उद्योग, पर्यटन, पायाभुत सुविधा, सामान्य सेवा आणि प्रदुषण नियंत्रण व्यवस्थापन या विषयांवर समित्यांचे गठण करण्यात आले आहे.