आगामी काळात जिल्ह्यात गोकूळाष्टमी, पोळा, गणपती, ईद असे विविध धर्मीय सण साजरे केले जाणार आहे. त्यातच गणपती विसर्जन आणि ईद हे एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे. या दोन्ही सणांमध्ये मिरवणुकीचे आयोजन केले जाते. चंद्रपूर जिल्हा आणि शहर हे सुरवातीपासूनच शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते. सर्वधर्मीय सण – उत्सव येथे गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. त्यामुळे हीच ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. तर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या सदस्यांनी चंद्रपूरचा सामाजिक सलोखा आणि ऐक्य अबाधित राहील, याची ग्वाही दिली.
नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.चंद्रपूरची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी प्रत्येक जण आपापली जबाबदारी योग्य रितीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त गौडा यांनी व्यक्त केला.