भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चांद्रयान-3 चा लँडर आज, बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनीटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणार आहे. ही मोहिम निर्विघ्नपणे पार पडली तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचणारा भारत हा पहिला देश असेल.
चांद्रयानचे दुसरे आणि अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन रविवारी रात्री 1.50 वाजता पूर्ण झाले. यानंतर, लँडरचे चंद्रापासून किमान अंतर 25 किमी आणि कमाल अंतर 134 किमी आहे. डीबूस्टिंगमध्ये, स्पेसक्राफ्टचा वेग कमी केला जातो. चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी, लँडर मॉड्यूलची स्थिती आणि चंद्रावरील परिस्थितीच्या आधारे, त्या वेळी लँडिंग करणे योग्य आहे की नाही हे ठरवले जाईल. जर कोणताही घटक चिन्हांकित नसेल तर 27 ऑगस्ट रोजी लँडिंग केले जाईल. चांद्रयान-3च्या लँडिंगचा थेट कार्यक्रम 5:20 वाजता सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स देशांच्या बैठकीसाठी मंगळवारपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असल्यामुळे या कार्यक्रमात व्हर्च्युअली सहभागी होतील.
यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी या लँडिंगबाबत इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले होते की, ‘जर सर्व काही बिघडले, सर्व सेन्सर निकामी झाले, काहीही काम केले नाही, तरीही तो (विक्रम) उतरेल, जर अल्गोरिदम व्यवस्थित काम करत असेल. यावेळी विक्रमचे 2 इंजिन निकामी झाले तरी ते उतरण्यास सक्षम असतील याचीही आम्ही खात्री केली आहे असे सोमनाथ यांनी स्पष्ट केले होते. चांद्रयान-3 च्या लँडरच्या सॉफ्ट लँडिंगला 15 ते 17 मिनिटे लागतील. या कालावधीला 15 मिनिटे टेरर म्हटले जात आहे. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरेल.