उत्तराखंडमधील जोशीमठ सध्या एका भयानक संकटाला तोंड देतंय. एकाचवेळी शहरातल्या पाचशेहून अधिक घरांना मोठे तडे गेले आहेत. जोशीमठची ही अवस्था होण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत CSIR चे माजी महासंचालक डॉ शेखर मांडे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना काही महत्वाच्या बाबींवर भाष्य केलं आहे. .
जोशीमठावर आलेल्या आपत्तीचं नेमकं कारण काय? नैसर्गिक कारणांसह मानवी हस्तक्षेप देखील याला जबाबदार आहे का? याबाबत त्यांना विचारलं असता डॉ मांडे म्हणाले की, जोशीमठ ज्या संकटाला तोंड देतंय त्याला ही दोन्ही कारणं जबाबदार आहेत. याबद्दल सांगताना डॉ शेखर मांडे म्हणाले, 1976 मध्ये मिश्रा कमिटीचा एक रिपोर्ट आला होता. त्यात असं सांगितलं गेलं होतं की तिथली मातीची गुणवत्ता ही फार चांगली नसल्यानं ते आपत्ती क्षेत्र आहे, तिथे भूस्खलन होण्याची शक्यता आहे. तिथली माती ठिसूळ असल्याने भूस्खलन होणं साहजिक आहे. त्याचबरोबर मानवाने तिथे केलेली कामं बांधकाम हे देखील याला जबाबदार आहे. जोशीमठ प्राचीन भूस्खलन क्षेत्रात आणि पर्वताच्या तुटलेल्या एका तुकड्यावर, मातीच्या अस्थिर ढिगाऱ्यावर वसलंय. घरं, बांध बांधणे यामुळे जमीन ठिसूळ होते आणि सांडपाणी व्यवस्था नसल्याने पाणी जमिनीत मुरत जातं आणि ज्यामुळे माती वाहून जाते, जमीन खाली धसते आणि तेच आपल्याला इथे बघायला मिळतंय.
पर्यटनाला इथे जास्त प्रोत्साहन नाही दिलं तर जोशीमठ सारख्या स्थानांना मदत होऊ शकते. पर्यटनाला चालना दिली तर बांधकामं वाढणार, लोकसंख्या वाढणार आणि मग अशा आपत्ती येत राहणार, त्यापेक्षा प्रशासनाने इथे पर्यटनाला प्रोत्साहन देऊ नये. जोशीमठातील रहिवाशी यांच्यासाठी पर्यायी मार्ग शोधून त्यांना होणारा त्रास कमी करता येईल आणि त्यांचं विस्थापन करून सोय करता येईल, असंही मांडे म्हणाले.
मांडे म्हणाले की, आपण या भागाची जिऑलॉजी बघितली तर हिमालय हा तसा नवीन पर्वत आहे. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करतात.काही दशलक्ष वर्षांपूर्वी युरेशियन प्लेट आणि इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट या दोन टेक्टोनिक प्लेट्स धडकल्यामुळे हिमालय पर्वत रांग तयार झाली. हिमालयाच्या जमिनीची गुणवत्ता आणि इतर भागांमधील मातीची गुणवत्ता वेगळी आहे, माती ठिसूळ आहे, हिमालयाच्या पायथ्याशी भूकंप येतात आणि ते येत राहणार कारण हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. जर आपण मानवी हस्तक्षेप बंद केला, बांधकाम कमी केलं आणि इथला विकासाचा आराखडा जर नीट तज्ज्ञांकडून प्लॅन केला तर हे कमी होऊ शकेल, असं ते म्हणाले.
डॉ शेखर मांडे म्हणाले की, निसर्गाबरोबर राहून पर्यटनाला वाव द्यायला हवा, पर्यटनाला वाव देताना अतिरेक होऊ नये. गंगा, ब्रह्मपुत्रा, हिमालय इथे आपण बांधकाम करतो, ५-६ माजली हॉटेल बांधतो आणि त्याने निसर्गाचं नुकसान होतं. केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांनी माहितीपट तयार केला आहे की आपत्ती प्रवण क्षेत्रांमध्ये बांधकाम कसं करायला हवं. आपण निसर्गाबरोबर राहून पर्यटनाला वाव दिला आणि प्रोत्साहन दिलं तर जास्त बरं पडेल, असं ते म्हणाले.