तभा वृत्तसेवा,
सोलापूर, दि. 19 ऑक्टोबर –
गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य शासनाकडून आलेल्या आनंददायी शिधा अर्थात दिवाळी किटचे शास्त्रीनगर झोपडपट्टीतून बुधवारपासून वाटप सुरू करण्यात आले.
शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाअंतर्गत परिमंडळ क मधील रेशन दुकान क्रमांक 49 मधील कार्डधारकांना श्रीराम मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याहस्ते आनंदाचा शिधा देण्यात आला. शंभर रुपयात या किटमध्ये एक लिटर गोडेतेल, एक किलो डाळ, एक किलो रवा व एक किलो साखरेचा समावेश आहे. या किटमुळे गरिबांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. याप्रसंगी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, सहाय्यक अधिकारी विवेक साळुंखे, परिमंडळ अधिकारी सुरेश गायकवाड, अनिल गवळी, पुरवठा निरीक्षक अनिल शहापुरे, सुरेश यमपुरे, रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर उपस्थित होते. याप्रसंगी शास्त्रीनगर व परिसरातील झोपडपट्टीतील कार्डधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमावर आक्षेप…
गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाचा शिधा हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची सुरुवात शहरातील मध्यवर्ती भागातून करणे लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करणे अपेक्षित होते अशी प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यावर जिल्हाधिकार्यांनी हा उपक्रम शहरातील प्रमुख भागात प्राधान्यक्रमाने राबविण्याचे आदेश दिले आहेत.
आनंदाचा शिधा वाटप उद्घाटन
शहरातील बाकळे कलेक्शन मागे, मेतन हॉस्पिटल शेजारी, कन्ना चौकातील रेशन दुकानातील कार्डधारकांना मिळणार्या 100 रुपये शिधा संचाव्यतिरिक्त शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव धान्य दुकानदारांकडून 1 मोती साबण उटणे पॅकेट सुगंधी तेल बॉटलसह अगदी मोफत स्वरुपात स्वत:च्या छापील पिशवीसह देण्यात येणार आहे. याचा शुभारंभ पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ.त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा आधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण आधिकारी सुमित शिंदे यांच्याहस्ते आनंदाचा शिधा संच वाटप गुरुवार दि.20 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.