ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याचा निपटारा करण्यासाठी “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” या उपक्रमांतर्गत ठाण्यात 1 सप्टेंबर रोजी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने ठाणे शहरातील गडकरी रंगायतन समोरील शिवसमर्थ माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देणे, त्यांना मुख्य़ प्रवाहाचा भाग बनविण्यासाठी, त्यांना मानाने जगण्याची संधी देणे, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे, असे शिनगारे यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यात दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती देण्यासाठी विविध शासकीय विभागांचे 50 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ तसेच इतर विविध विकास महामंडळेही सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात विविध शासकीय योजनांची माहिती, त्यासंदर्भातील अर्ज, केंद्र शासनामार्फत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या युडीआयडी कार्डसाठी अर्ज भरून घेणे, दिव्यांगासंदर्भातील इतर कागदपत्रांसाठी अर्ज करणे, कर्ज योजनांची माहिती देणे, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज भरून घेणे आदी उपक्रम मेळाव्यात होणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात येणार आहे. शासकीय योजनांचे लाभ तसेच स्वयंसेवी संस्थामार्फत दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी प्राप्त अर्जांवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिनगारे व जिंदल यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात एकूण 6 महानगरपालिका, सर्व पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपालिका यांचाही या मेळाव्यात सहभाग असणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचविण्यात येतील. त्यामुळे दिव्यांग व्यक्तिंना शासकीय योजनेचा लाभ सुलभरित्या मिळण्यास मदत होईल.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधव-भगिनींनी या मेळाव्यास उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिनगारे व जिंदल यांनी केले आहे.