महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्यामार्फत ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये श्री. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री.अभय ज. मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ईश्वर कां. सूर्यवंशी यांच्या समन्वयाने “राष्ट्रीय लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीस अभूतपूर्व असे भरघोस यश प्राप्त झाले असून यात एकूण ३७ हजार ३६२ प्रकरणे निकाली निघाली असून याद्वारे एकूण २ अब्ज ८८ कोटी ३ लाख १२ हजार २३४ रूपयांची तडजोड यशस्वी झाली आहे.
न्यायालयातील वाढता ताण लक्षात घेता प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आवश्यक असून राष्ट्रीय लोकअदालतमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्याने पक्षकारांस तात्काळ न्याय मिळतो व न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होतो, या आवाहनास पक्षकार, विधीज्ञ, शासकीय, निमशासकीय विभाग, बँक अधिकारी- कर्मचाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला व प्रलंबित २० हजार २३८ प्रकरणे निकाली निघाली, अशी माहिती सचिव श्री. ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली. राष्ट्रीय लोकअदालत हा लोकांच्या समस्या सोडविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
मोटार अपघातांच्या ३८२ प्रकरणांमध्ये तडजोड होवून ३५ कोटी ०९ लाख २९ हजार ८३३ रूपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मोटार अपघात दावा न्यायाधीकरण, ठाणे यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांमध्ये मयत व्यक्तींच्या वारसांना जास्तीत जास्त मोटार अपघात नुकसान भरपाई मंजूरीकरीता श्री. ए. एम. शेटे, जिल्हा न्यायाधीश- १, श्री. ए.एन. सिरसीकर, जिल्हा न्यायाधीश-२, श्रीमती एस.एन.शाह, सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधीकरण, ठाणे, श्री. पी. एस. विठलाणी, जिल्हा न्यायाधीश-४, ठाणे, श्री. एस. बी. कचरे, जिल्हा न्यायाधीश- १, कल्याण, श्री. पी. आर. अष्टुरकर, जिल्हा न्यायाधीश- ५, कल्याण, श्री. ए.एस. प्रतिनिधी, जिल्हा न्यायाधीश- १, पालघर, श्रीमती ए.व्ही. चौधरी-इनामदार, जिल्हा न्यायाधीश- २, पालघर, तसेच श्री. एस. व्ही खोंगल, जिल्हा न्यायाधीश- २, वसई, श्री. आर. डी. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश- ३, वसई, श्री. आर. एच. नाथानी दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वसई, श्री. पी.ए.साने, जिल्हा न्यायाधीश- १, बेलापूर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यात ठाणे मुख्यालयातील एका मोटार अपघात दाव्यामध्ये रक्कम रू.६५ लाख व एका प्रकरणात रक्कम रूपये ६० लाख अशा दोन प्रकरणांत उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून पिडीतांना मंजूर करण्यात आली आहे. तसेच इतर अशाच मोटार अपघात दाव्यांमध्ये लोकअदालतीद्वारे तडजोडीअंती समेट घडवून आणण्याकरिता यशस्वी प्रयत्न केले गेले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे चे सचिव श्री. ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली आहे.
या लोकअदालतील १५९ वैवाहिक प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली आहेत. ठाणे महानगरपालिका व इतर महानगरपालिकेच्या थकित कराची वसूलीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.
“राष्ट्रीय लोकअदालत” बाबत ठळक बाबी…
ठाणे जिल्हयात एकूण ३७ हजार ३६२ प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. याद्वारे एकूण एकूण २ अब्ज ८८ कोटी ३ लाख १२ हजार २३४ रूपयांची तडजोड यशस्वी झाली. त्यापैकी २० हजार २३८ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांत रक्कम २ अब्ज ३७ कोटी ७९ लाख ८५ हजार ४५६/- इतक्या रक्कमेची तडजोड करण्यात आली. दाखलपूर्व १७ हजार १२४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांत रक्कम ५० कोटी २३ लाख २६ हजार ७७८/- इतक्या रक्कमेची तडजोड करण्यात आली. किरकोळ स्वरूपाच्या १५ हजार ८५६ फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुली करण्यात आली.
या लोकअदालतमध्ये प्रथमच Debts Recovery Tribunal (DRT) प्राधिकरणाद्वारे २८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून एकूण तडजोडीची रक्कम रू.१ अब्ज २७ कोटी १५ लाख ६४ हजार २३७/- इतकी आहे. या लोकअदालतीमध्ये तुरूंगात बंदी असलेल्या कैद्यांच्या प्रलंबित प्रकरणांस विशेष प्राधान्य देण्यात आले. या लोकअदालतीमध्ये किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास १५ हजार ८५६ आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम जमा केली.
लोकअदालतमध्ये ई-फायलिंग प्रणालीचा यशस्वी प्रयोग…
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये बेलापूर न्यायालयाद्वारे ई-फायलिंग प्रणालीद्वारे प्रकरणे निकाली काढण्याचा यशस्वी प्रयोग केला. यामध्ये प्रकरण दाखल करण्यापासून ते निकाली निघेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया कागदपत्राशिवाय ई-प्रणालीने करण्यात आली असून एकूण १७१ प्रकरणे ई-प्रक्रियेने निकाली निघालेली आहेत. ई-प्रणालीमुळे पडताळणी व तडजोड करण्यास प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वेळ व पैसा वाचणार असून ही प्रक्रिया पेपरलेस असल्याने त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. विनाकागदपत्रांची (पेपरलेस) ई-फायलिंग प्रकरणांमध्ये ई-व्हेरिफिकेशन करण्यात येवून एकूण १७१ प्रकरणे ई-निकाली काढण्यात यश प्राप्त झाले आहे. ठाणे जिल्हयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १० ते १५ वर्ष जुनी असंख्य प्रकरणे निकाली काढण्यात आली. वैवाहिक प्रकरणांमध्ये तडजोडीस मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून एकूण १५९ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली असून यामुळे अनेक संसार पुन्हा जुळले.
दाखलपूर्व बँक रिकव्हरी ची एकूण ४५४ प्रकरणे निकाली निघाली असून रू. ३ कोटी ०६ लाख ५५ हजार ७६४/- इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली.
एन. आय. अॅक्ट कलम १३८ ची १ हजार ४५० प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली असून तडजोडीची रक्कम रू. २६ कोटी ७४ लाख ७६ हजार ३३१/- इतकी आहे.
प्रॉपर्टी टॅक्स / रेव्हेन्यू ची दाखलपूर्व ६ हजार ५९० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून तडजोडीची रक्कम रू. ३७ कोटी ०५ लाख २८ हजार ११२/- इतकी आहे.
पाणीपट्टीची दाखलपूर्व २ हजार ६९० प्रकरणे निकाली निघाली असून एकूण तडजोडीची रक्कम रु. १ अब्ज ८२ लाख ८४ हजार ०२८/- इतकी आहे.
राज्य उत्पादन शुल्क, ठाणे अंतर्गत निरीक्षक कार्यालयातील एकूण ७४ केसेस मध्ये दोषसिध्दीचे निकाल दिले असून एकूण रक्कम रूपये १८ लाख ४१ हजार इतक्या रकमेचा दंड आरोपितांकडून जमा करण्यात आलेला आहे.
याशिवाय या लोकअदालतीमध्ये कारागृहातील न्यायाधीन बंदयांची प्रकरणे ठेवून कारागृहातील न्यायाधीन बंदींपैकी जवळपास २१ बंदयांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
या लोकअदालतीस ठाणे जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रशांत कदम तसेच ठाणे वकील संघटनेचे पदाधिकारी, सर्व विधीज्ञ सदस्य, सरकारी वकील, पोलीस प्रशासन, इन्शुरन्स कंपनी, न्यायालयीन कर्मचारी, संगणक कक्षातील कर्मचारी यांच्या परिश्रमाने व उत्स्फूर्त प्रतिसादाने मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे सचिव ईश्वर कां. सूर्यवंशी यांनी दिली आहे.