बनावट सोने खरे असल्याचे दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करत त्याला आठ लाखाचा गंडा घातल्याची घटना २० जुलै रोजी सकाळच्या सुमारास कल्याण शिळ डायघर रोड चित्ते पेट्रोलपंप जवळील टाटा नाका गोलविली येथे घडली. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उसरघर येथील रहिवासी खडक बिशन सिंह ( ६७ ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सिंह हे घराजवळील खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांना एक अनोखळी इसम भेटला. या इसमाने त्याच्याजवळील त्याच्याकडे भारतीय चलनातील जुने १ रुपयाचे कॉईन दाखविले. सिंह यांना ते कॉईन देऊन अनोखळी इसमाने माझ्याकडे आणखी कॉईन असल्याचे सांगून मोबाईल नंबर घेतला. सिंह यांच्या मोबाईलवर त्या इसमाने फोन करून `माझेकडे भारतीय चलनातील जुने कॉईन तसेच १ किलो सोन्याचे दागिने असून मला पैशाची अत्यंत गरज असल्याने ते मी विकणार असून ते आपण खरेदी करता का असे विचारले. त्या इसमाने सिंह यांचा विश्वास संपादन करून जवळील मणीमाळ दाखवून त्यामधील दोन मणी तोडून देण्याचा बहाणा करून त्यातील दोन मनी देऊन खात्री करण्यास सांगितले. ते खरे मणी देऊन सिंह यांना भास करून सोने खरेदी करण्यास प्रोत्साहन केले. सिंह यांना २० तारखेला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सोने खरेदी करण्यासाठी कल्याण शिळ डायघर चित्ते पेट्रोल पंपजवळ टाटा नाका गोलीवली ( डोंबिवली पूर्व ) येथे बोलावले. ठरलेल्या ठिकाणी सिंह आले असता त्यांनी त्याच्याजवळील रोख रक्कम ८ लाख रुपये इसमाने घेऊन बनवत सोने खरे असल्याचे भासवून फसवणूक केली.