बंद करा … बंद करा ..दारू विक्री बंद करा… अशा घोषणा देत लातूरच्या उदगीर तालुक्यातल्या दावणगाव येथील विद्यार्थ्यांनी गावात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. या मोर्चाला गावातील महिलांसह नागरिकांनी साथ दिली. दावणगाव उदगीर तालुक्यातील एक मोठं गाव आहे. या गावात मागील अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री करणारे कार्यरत आहेत. या सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे गावातील तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. दारुच्या व्यसनाने अनेकांचे संसार मोडले आहेत तर यामुळं आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण झाले आहेत.
याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. उदगीर ग्रामीण पोलिसात देखील याबाबत माहिती दिली होती, मात्र अवैध दारू विक्रीला लगाम बसू शकला नाही. यामुळे संतप्त होत गावातील दोन शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी एकत्र येत गावातून जनजागरण रॅली काढली. यात मोठ्या संख्येने गावातील महिलांनी घराबाहेर पडत उपस्थिती नोंदवली होती.
दारू विक्री बंद नाही झाली आणि यातील दोषी लोकांवर कारवाई नाही झाली तर पुढील आंदोलन यापेक्षा तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी विद्यार्थी आणि नागरिकांनी दिला आहे. दावणगाव येथील बहुतांश गावकरी शेती व्यवसाय करतात. गावातील अनेक कुटुंबं मोलमजुरी करुन गुजराण करतात. यात काही मंडळी मात्र व्यसनाच्या आहारी गेली आहे. हाताला चार पैसे आले की कुटुंबातील व्यक्ती दारूचा अड्डा जवळ करतो. नित्यनियमाने दारू पिणे आणि गावात गोंधळ घालणं असा अनेकांचा दिनक्रम झाला आहे. यामुळे गावात सामाजिक शांतता बिघडली आहे. याचा थेट परिणाम कुटुंबांवर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील याचा परिणाम होत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबाची अर्थव्यवस्था पार मोडकळीस आली आहे.
दावणगावामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीस अनेक वेळा दारू विक्री करू नको असं सांगण्यात आलं होतं. याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती. मात्र याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. गावात उघडपणे दारू विक्री सुरूच आहे. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आपला आवाज उठवण्यासाठी आज मोर्चाचं आयोजन केलं.