नवीन वर्षाची सुरुवात होताच या महत्त्वपूर्ण बँकेने व्याजदरात वाढ करून आपल्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ही बँक आहे, बँक ऑफ बडोदा (BoB) या बँकेने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) ०.३५ टक्क्यांनी वाढवला आहे. यामुळे बेंचमार्क कर्ज दराशी जोडलेले कर्ज महाग होईल. BoB ने शेअर मार्केटला दिलेल्या माहितीत सांगितले की, नवीन दर १२ जानेवारीपासून लागू होतील.
एक दिवसाचा MCLR ७.५० वरून ७.८५ टक्के करण्यात आला आहे. तर एक महिना, तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठीचा MCLR ०.२० टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे ८.१५ टक्के, ८.२५ टक्के, ८.३५ टक्के आणि ८.५० टक्के करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गेल्या वर्षी मे पासून मुख्य धोरण दर रेपो दरात २.२५ टक्क्यांनी वाढ केली. रेपो दरात ७ डिसेंबर २०२२ रोजी ०.३५ टक्क्यांनी शेवटची वाढ करण्यात आली होती.
MCLR मध्ये झालेली वाढ
एक दिवस – 7.85 टक्के
एक महिना – 8.15 टक्के
तीन महिने – 8.25 टक्के
सहा महिने – 8.35 टक्के
एक वर्ष – 8.50 टक्के
कोणाला बसणार फटका
MCLR वाढल्याने कॉर्पोरेट कर्जदारांना सर्वात जास्त फटका बसणार आहे. मॉर्गेज, ग्राहक कर्ज आणि लघु व्यवसाय कर्जांसह किरकोळ कर्जासाठीचे बहुतेक दर MCLR वर आधारित असतात.
दुसरीकडे, इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने ईएफआय ठेवींवरील व्याजदरात ०.४५ टक्क्यांपर्यंत बदल केला आहे. हा बदल तात्काळ लागू करण्यात आला आहे. IOB ने एका निवेदनात म्हटले आहे की यासह, घरगुती, NRO आणि NRE (अनिवासी बाहेरील) यांना आता ४४४ दिवसांच्या ठेवींवर ७.७५ टक्के व्याज मिळेल. परकीय चलन ठेवींवरील व्याजातही एक टक्का वाढ करण्यात आली आहे.