विविध टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने एका तरुणीने एकास सुमारे 16 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी भूषण पांडुरंग राऊत (रा. अमृता हाईट्स, चर्चच्या वर उत्तमनगर, नाशिक) हे दि. 7 जून रोजी घरी असताना त्यांना 9950897999 या क्रमांकाच्या मोबाईलवरून वरुण तनू असे नाव सांगून एका तरुणीने फोन केला. त्यावेळी या तरुणीने फिर्यादीला विविध टास्क पूर्ण करण्याचा बहाणा केला.
या बहाण्याने वरुण तनू नामक तरुणीने टेलिग्राम आयडीचा धारक व वेगवेगळ्या बँक खातेधारकांनी संगनमत करून टास्क पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने 7 जून ते 10 जुलै या कालावधीत सुमारे 16 लाख 3 हजार 210 रुपये आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरणा केला. मात्र एवढी मोठी रक्कम देऊनही टास्क पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.