स्वातंत्र्यदिनी मंगरुळ टोलनाक्यावर ध्वजारोहणाप्रसंगी एका कर्मचाऱ्याने दिलेल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेचे चांदवड शहरात पडसाद उमटले. येथे सर्वपक्षीयांच्या वतीने शासकीय विश्रामगृहापासून चांदवड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजी करणाऱ्या संशयिताविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
मोर्चात ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. पोलीस स्टेशन आवारात मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष विकास भुजाडे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, अशोक व्यवहारे, निवृत्ती घुले, गुड्डु खैरनार, शंभू खैरे, दत्ता गांगुर्डे, महेश खंदारे, सचिन निकम, विनायक हांडगे, सागर आहिरे, नीलेश ढगे, तुषार झारोळे, विशाल ललवाणी आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.