परभणी बाह्यवळण रस्त्यासह राष्ट्रीय महामार्गाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाही देवून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी परभणी जिल्ह्यातील बाह्यवळण व नवीन रस्ते व गोदावरी पुलावरील कामांना मंजूरी बहाल करतेवेळी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केला. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शनिवारी (दि.25) दुपारी परभणीत बाह्यवळण रस्त्याच्या भूमीपूजनासह अन्य कामांच्या कोनशिला समारंभाप्रसंगी या महत्वपूर्ण घोषणा केल्या.
जिल्ह्यातील सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या नेतमेमंडळींनी आपल्या भाषणातून काही मागण्या केल्या. त्या सर्व मागण्यांची गडकरी यांनी दखल घेतली. पाठोपाठ आपल्या भाषणातून या संदर्भातील घोषणासुध्दा केल्या.
चारठाणा ते जिंतूर या नव्या कामाकरीता 250 कोटी रुपये, गंगाखेड ते लोहा या महामार्ग कामाकरीता 500 कोटी रुपये, इंजेगाव ते सोनपेठ या रस्ते कामाकरीता 260 कोटी रुपये, इसाद ते किनगाव या रस्ते कामास 125 कोटी रुपये मंजूर करत आहोत, असे गडकरी यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे परभणी ते गंगाखेड रस्त्यावरील गोदावरी नदीवरील नवीन पूलाच्या कामास मंजूरी बहाल करतेवेळी 150 कोटी रुपये जाहीर केले.
गंगाखेड ते लातूर या महामार्गावरील आरओबी मंजूर केला. पाठोपाठ गंगाखेड येथील बाह्यवळण रस्त्याकरीता नियोजित कामांनाही मंजूरी बहाल केली. विशेष म्हणजे परभणी बाह्यवळण रस्त्यालगतच्या गावातील जोडरस्ते, पथदिवे वगैरेच्या कामांना पूरेसा निधी देवू, असे स्पष्ट करतेवेळी परभणी बाह्यवळण रस्त्याच्या कामा पाठोपाठ शहरालगतच्या दुसर्याही बाह्यवळण रस्त्यास मंजूरी बहाल करत आहोत, असे गडकरी यांनी जाहीर केले.
या रस्ते कामाकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने तात्काळ भूसंपादनासंदर्भात हालचाली कराव्यात, जिल्हाधिकार्यांनी सरकारी जमीनींच्या भूसंपादनासंदर्भात लक्ष घालावे, कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सरकारी जमीन रस्तेकामा संदर्भात उपलब्ध करण्यासंदर्भात विचार करावा, असे गडकरी यांनी म्हटले. भूसंपादनासंदर्भात निर्णय झाल्यास अवघ्या काही महिन्यात या कामास सुरुवात करु, असे जाहीर केले.