केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६६वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनेक मंडळी नितीन गडकरी यांना शुभेच्छा देत आहेत. तर राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितीन गडकरी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही नितीन गडकरी यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. विविध पोस्ट त्या शेअर करताना दिसतात. आताही नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. अमृता व नितीन यांचा हा एकत्रित फोटो आहे. त्यांनी अगदी हटके अंदाजात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्यासाठी खास पोस्टही लिहिली आहे.
अमृता म्हणाल्या, “त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. प्रत्येकाला ध्येय गाठण्याची इच्छा असते. पण यांना मार्ग शोधण्याची आवड आहे. नितीन गडकरी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ज्यांनी देशभरात रस्ते मोठ्या प्रमाणात तयार करत आमचा प्रवास सुखकर केला”. अमृता यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत नितीन गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सकाळपासूनच नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी गर्दी केली. शिवाय यावेळी गडकरी यांच्या हस्ते दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी देण्यात आल्या. तर सोशल मीडियावरही नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी विविध पोस्ट शेअर केल्या आहेत.