कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी एडेलवाईज कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आले आहे. यामध्ये एडेलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शाह यांचा समावेश असून स्मित शाह, आर.के. बन्सल, जितेंद्र कोठारी, केऊर मेहता या पाच जणांवर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रायगड पोलीस लवकरच सर्वांना समन्स बजावून चौकशीला बोलावणार असल्याची माहिती मिळत आहे.
नितीन देसाई आणि एडेलवाईज कंपनी यांच्यातील कर्जाच्या मुद्द्यावर एनसीएलटी कोर्टाने ऑर्डर दिली होती. त्यावेळी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. जितेंद्र कोठारी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली दोन्ही बाजूने चर्चा होऊन एक ठराविक रक्कम ठरवण्याबाबत एनसीएलटी कोर्टाने निर्देश दिले होते. या प्रकरणात कोठारी यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने कोठारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
देसाई यांच्या कुटुंबियांचा आरोप
दरम्यान देसाई यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपात आत्महत्या करण्याआधी देसाई अनेकदा एडेलवाईज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलत होते. त्यात ते वन टाईम सेटलमेंटसाठी तयार होते. यासाठी त्यांची कंपनी अधिकाऱ्यांसोबत भेट झाली होती. पण सेटलमेंटसाठी कंपनीने होकार किंवा नकार कळवला नाही. मात्र फक्त वेळ मारून नेण्याचे काम कंपनीने केले. तसेच कंपनीने कर्जाच्या रकमेवर व्याज वाढवण्याची वाट पाहिली. पुढे एडेलवाईज कंपनी एनसीएलटी कोर्टात गेली आणि कोर्टाचा आदेश देसाई यांच्याविरोधात आला. स्टुडिओ कब्जात घेण्यासाठीच कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न होत होते. त्यामुळे १८० कोटींचे मूळ कर्जाचे व्याज २५२ कोटींपर्यंत एडेलवाईज कंपनीने वाट पाहिली असल्याचेही यात म्हटले आहे. ही रक्कम मोठी झाल्यानंतर अचानक कोर्टात जाऊन देसाई यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला.