उसाची प्रतिएकरी उत्पादकता वाढली पाहिजे. जमिनीची सुपीकता, ऊस लागवडीची पद्धत, रासायनिक खतांच्या मात्रा, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण आदि पंचसूत्री ऊस पिकांच्या वाढीकरिता आवश्यक असून, या पंचसूत्रीची अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांना एकरी शंभर टक्के उत्पादन मिळेल, असा विश्वास मंडल कृषी अधिकारी अनिल दुरगुडे यांनी व्यक्त केला.
जेऊर (ता.पुरंदर) येथे कृषी विभागाच्या वतीने एकरी शंभर टन ऊस उत्पादन अभियान व ऊस पाचट व्यवस्थापन मोहिमेंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मंडल कृषी अधिकारी अनिल दुरगुडे बोलत होते. जेऊर-मांडकी हा परिसर उसाचा आगार म्हणून ओळखला जात असून उसाचे एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी उसाचे पाचट न जळता ते शेतात कुजवून जमिनीची सुपीकता व ऊस उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. पाचटामुळे पाणी व वीज बिलात बचत होते, तण नियंत्रण करता येते जमीन सुपीकता वाढून प्रदूषण घटते, असे अनिल दुरगुडे यांनी सांगितले.