पंढरपूर शहरास केवळ चार दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा येथील भीमा नदीत शिल्लक राहिला आहे. तातडीने उजनी धरणातून पाणी सोडण्याची गरज आहे. पाणी नाही सोडले तर पंढरपूर शहरावर निर्जळीचे संकट ओढवणार आहे. सध्या एक दिवसआड सुरू असलेला पाणीपुरवठा तीन दिवसांवर लांबवण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ८० गावची शिरभावी पाणीपुरवठा, कासेगाव पाणीपुरवठा योजनाही भीमा नदीतील पाण्या अभावी बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच झालेला नाही. मागील ३० दिवसांत पंढरपूर शहर आणि तालुका पावसाअभावी पूर्णपणे कोरडा गेला आहे. त्याचबरोबर कडक ऊन पडत असल्याने भीमा नदीतील पाणी वेगाने संपले आहे. पंढरपूर तालुक्यातील एकही ओढा सध्या वाहत नाही, सगळे ओढे, नाले कोरडे पडलेले आहेत. विहिरींनी तळ गाठलेला आहे. आणि भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्या अभावी कोरडे पडलेले आहेत.