पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध करण्यात यात असून आरोपीना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट यांनी राज्यसरकारकडे केली आहे .
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना काही दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी उघडपणे शिवीगाळीचे समर्थन देखील केले होते. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली होती.
दरम्यान संदीप महाजन रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावानं ओळखला जातो. येथेच त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण करण्यात आली. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.या हल्ल्याचा महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट तीव्र निषेध करत असून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टात आरोपपत्र तत्काळ दाखल करण्यात यावे, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी राज्यसरकारने पोलीस प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी अध्यक्ष श्रीनिवास गुंडारी आणि सरचिटणीस प्रमोद खरात यांनी केली आहे .