नव्या वर्षाच्या स्वागताबरोबरच निरोगी आहार, व्यायाम, वजन कमी करणे, चांगले आरोग्य या सोबतच पुरेशी झोप ही घेण्यासाठी विशेष भर देणे गरजेचे आहे. उत्तम झोप ही वजन (Weight), रक्तदाब , रक्त शर्करा , मेंदूचे आरोग्य एकंदरीत संपूर्ण आरोग्याशी निगडीत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये, अमेरिकन हार्ट असोसिएशनने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांना दूर ठेवण्यासांठीच्या चांगल्या आरोग्याच्या सवयींच्या यादीमध्ये पुरेशी झोप हा महत्त्वाचा मुद्दा समाविष्ट केला आहे.
पुरेशी झोप घेणे ही प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते. पुरेशी झोप ही केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करते असे नाही तर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील पुरेशा झोप घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने नैराश्य आणि पोस्टट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता देखील कमी होते.
प्रत्येकाला आठ तासांची गरज असते असे नाही तर झोपेचे गणित हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. प्रौढांना सहसा सात ते नऊ तासांच्या झोपेची आवश्यकता असते तर लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना त्याहूनही जास्त झोपेची आवश्यकता असते. अवेळी झोप घेणे, फार वेळ झोपणे आणि कमी वेळ झोपणे या तीनही गोष्टी शरीराचे आरोग्य बिघडवतात.
सुट्टीच्या वेळी जास्त तास झोपून आठवड्याभराची झोपेची कमतरता भरुन निघत नाही. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा पुरेशी झोप घेणे शक्य होत नाही. मग अशावेळी सुट्टीच्या दिवशी भरपूर झोप घेतली तर आठवड्याभराचे झोपेचे गणित सुरळीत केले जाऊ शकत नाही. रविवारी जास्तीचे दोन तास झोपण्यापेक्षा, आठवड्यातून प्रत्येक दिवशी 15 मिनिटे अधिक झोप घेणे उत्तम राहिल.