ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानली जाणारी एसटी बस कोरोनाकाळानंतर आता पुन्हा भरारी घेत आहे. आताज आरामदायी प्रवासासाठी साध्या बसेसना देखील ‘पुश बॅक’ सीट बसविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बसेस ‘एअर सस्पेन्शन’ तंत्रज्ञानाच्या असल्याने प्रवासात प्रवाशांना धक्के बसणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली.
एसटी महामंडळात बराच काळ नवीन गाड्यांची खरेदी झाली नसल्याने जुन्या गाड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने २,७०० गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाकाळ आणि एसटीचा लांबलेला संप यामुळे नवीन गाड्यांची खरेदी बंद होती. आता एसटीने स्व-मालकीच्या दोन हजार गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीच्या पुणे येथील दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत बस बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. दापोडी, हिंगणा ( नागपूर), चिकलठाणा ( संभाजीनगर ) अशा तीन कारखान्यात एसटी गाड्यांची बांधणी सुरू आहे. दापोडी कारखान्यात ७०० बसेसची बांधणी सुरू आहे. येथे निमआराम श्रेणीच्या २०० हिरकणी ( एशियाड ), आरामदायी श्रेणीच्या ५० नॉन एसी स्लीपर, ५० सीएनजी, ५०० लालपरी साध्या बसेस अशा ७०० बसेसची बांधणी सुरू आहे.
दापोडी कारखान्यातून ५०० साध्या बसेसपैकी १४३ बसेस बांधून बाहेर पडल्या आहेत. उरलेल्या साध्या बसेसना आता आरामदायी ‘पुश बॅक’ सीट बसविण्यात येणार आहेत. या बसेस जून २०२३ पर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेस ॲल्युमिनियम ऐवजी माईल्ड स्टील ( एमएस ) बॉडीच्या आहेत. तसेच त्यांच्यात स्प्रिंग ऐवजी ‘एअर सस्पेन्शन’ तंत्रज्ञानाचा वापर असल्याने प्रवासात धक्के बसणार नाहीत अशी माहिती कार्यशाळा व्यवस्थापक दत्तात्रय चिकोर्डे यांनी दिली.
एसटीने आपला लोकप्रिय ब्रँड ‘हिरकणी’ पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आशियाई खेळांसाठी १९८२ मध्ये बनविण्यात आल्या होत्या. दिल्ली येथे एशियाड खेळाडूंची ने आण करण्याकरिता या बस वापरल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या एशियाड बसचे कौतुक केले होते. हीच एशियाड बस नंतर दादर-पुणे मार्गावर चालविण्यात आली होती. तिचे नामकरण नंतर ‘हिरकणी’ असे केले गेले. अशा २०० स्टील बांधणीच्या नव्या रुपातील हिरकणी बसेस दापोडीमध्ये बांधल्या जात आहेत.
-रायगड विभागातील रोहा आणि मुरुड आगारांच्या माध्यमाने या गाड्या धावणार आहेत. निमआराम श्रेणीप्रमाणेच तिकीट भाडे आकारण्यात येणार आहे. बस आकर्षक दिसावी म्हणून आतील बाजूस थर्मोप्लास्टिक शीट लावण्यात आली आहे. प्रवासी संरक्षणासाठी आणि स्क्रू दिसू नयेत यासाठी स्क्रू हेडवर कॅप कव्हर.
– रीडिंग लॅम्प आणि चार्जिंग सॉकेटची सुविधा असलेली तयार हॅटरॅक पुरविण्यात आली आहेत. प्रवाशांसाठी मॅगझिन पाऊच, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी होल्डर तसेच बॅग हूक इत्यादी सुविधा.
– गतिरोधक, खड्डे यांवरून धावताना प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी एअर सस्पेन्शनसह आरामदायक आसने.
– बसचे सौंदर्य वाढविण्यासाठी पुढील बाजूस चालकासमोर तयार डॅशबोर्ड बसविण्यात आले आहेत.
– बॅटरी बॉक्स, प्रवाशी सामान कक्ष, राखीव टायर (स्पेअर व्हील बॅकेट) इत्यादींच्या सुलभ हाताळणीसाठी बसच्या बाजूला व्यवस्था आहे. धुळीपासून संरक्षण होण्यासाठी लॉक कव्हर.
– सध्या हिरवा-पांढरा रंग आणि त्यावर निळा पट्टा अशा रंगसंगतीत हिरकणी धावत आहे. नवी हिरकणीत पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचा वापर आहे.