मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा चित्ते आणि कुनो येथे जन्मलेल्या तीन बछड्यांचा समावेश आहे. आज मरण पावलेला चित्ता मार्च महिन्यापासून मरण पावलेला सहावा प्रौढ चित्ता आहे. मध्य प्रदेश वन विभागानं बुधवारी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे.
मध्य प्रदेश वनविभागानं म्हटलं आहे की, कुनोतील मादी चित्त्यांपैकी एक चित्ता धात्री आज सकाळी मृतावस्थेत आढळून आली आहे. मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी चित्त्याच्या मृतदेहातं पोस्टमॉर्टम केलं जात आहे. 14 चित्ते कुनोच्या आवारात ठेवण्यात आले आहेत, ज्यामध्ये सात नर, सहा मादी आणि एक मादी बछडा यांचा समावेश आहे. मादी चित्ता अभयारण्यात मुक्तपणे संचार करत आहे, ज्यावर एका टीमद्वारे नजर ठेवली जात आहे. तिला आरोग्य तपासणीसाठी परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही वनविभागानं निवेदनात म्हटलं आहे.
26 जून रोजी कुनो नॅशनल पार्कमधील मोकळ्या जंगलात सूरज चित्ताला मुक्त आवारात सोडण्यात आलं होतं. कुनो नॅशनल पार्कच्या खुल्या जंगलात सोडण्यात आलेला सूरज हा दहावा चित्ता होता. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या ‘तेजस’ या नर चित्ताचाही 11 जुलै रोजी मृत्यू झाला होता. कुनो पार्क व्यवस्थापनाच्या निरीक्षणादरम्यान हा चित्ता जखमी अवस्थेत आढळून आला. तेजसच्या मानेच्या वरच्या भागात जखमा दिसत होत्या. कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 6 चित्ते आणि 3 बछड्यांचा मृत्यू झाला आहे.
नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले
कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता पुनरुज्जीवनासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून 20 चित्ते आणण्यात आले होते, परंतु आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे 6 प्रौढ चित्यांचा आणि 3 बछड्यांचा मृत्यू झाला आहे.
सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली होती चिंता
चित्त्यांच्या मृत्यूबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मे महिन्यात झालेल्या सुनावणीत खंडपीठाने चिंता व्यक्त केली होती. केवळ एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणं योग्य होणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. इतर अभयारण्यातही त्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तसेच, सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी आपण सरकारवर प्रश्न उपस्थित करत नसल्याचं स्पष्ट केले. तसेच, त्यांना फक्त चित्यांबाबत चिंता वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.