पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. अनेक प्रकारचे गुन्हे याबाबत उघडकीस येत आहेत. पुण्याच्या लोणी काळभोर परिसरात कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत निर्माण करणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केले असून त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून गुन्हे शाखेने (युनिट सहा) ही कारवाई केली आहे.
तेजस संजय बधे (वय १९), उदय सिद्धार्थ कांबळे (वय १९), प्रसाद ऊर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय १९, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय २०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय २८, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय. ४३, रा. वानवडी, पुणे) तसेच आणखी तीन अल्पवयीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे शहर आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात अल्पवयीन पोरं सोशल मीडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील धारदार कोयते ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रोहित जाधव याच्याकडे कोयते आढळून आले आहेत.