आजच्या काळात महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात तितक्याच अग्रेसर आहेत. या आपल्या नेतृत्त्व गुणांनी त्यांनी सर्व क्षेत्र व्यापली आहेत आणि फक्त त्यांनी नेतृत्त्वचं नाही केलं तर प्रसिद्धीही मिळवली. फोर्ब्सच्या १०० श्रीमंत महिलांच्या यादीत चार भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश आहे. यामध्ये एक नाव आहे पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि सीईओ इंद्रा नूयी यांचे. इंद्रा नूयी २४ वर्षे कंपनीसोबत राहिल्यानंतर २०१९ मध्ये निवृत्त झाल्या. २००७ ते २०१९ या काळात त्या पेप्सिकोच्या अध्यक्षा होत्या. फोर्ब्सच्या यादीत त्या ७७व्या क्रमांकावर आहेत.
इंद्रा नूयी यांचा प्रवास सोपा नव्हता. नूयी यांना त्यांच्या पहिल्या नोकरीच्या मुलाखतीसाठी वेस्टर्न सूट खरेदी करायचा होता. हा सूट खरेदी करण्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी रिसेप्शनिस्ट म्हणून रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केले. त्यावेळी त्या येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिकत होत्या.
इंद्रा नूयी यांचा जन्म १९५५ मध्ये भारतातील तामिळनाडू राज्यात झाला. इंद्रा नूयी यांचे वडील स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये काम करत होते, तर त्यांचे आजोबा जिल्हा न्यायाधीश होते. नूयी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात पदवीधर आहेत.
इंद्रा नूयी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य एका पुस्तकातून सर्वांसमोर मांडले आहे. या ३०० पानांच्या पुस्तकाचे नाव आहे ‘माय लाइफ इन फुल: वर्क, फॅमिली अँड अवर फ्युचर’ या पुस्तकात आहे.
इंद्रा नूयी यांनी आपल्या करिअरची सुरुवात जॉन्सन अँड जॉन्सनमधून केली होती. येथे त्यांनी उत्पादन व्यवस्थापक (Product Manager) म्हणून काम केले. येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्या १९८० मध्ये बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) मध्ये सामील झाल्या.
१९९४ मध्ये, इंद्रा नूयी या कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि डेव्हलपमेंटच्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून पेप्सिकोमध्ये सामील झाल्या. जेव्हा त्या पेप्सिकोमध्ये सामील झाल्या, तेव्हा अमेरिकेतील ५०० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एकाही कंपनीत महिला सीईओ नव्हती. २००१ मध्ये त्यांना कंपनीचे CFO बनवण्यात आले.
फोर्ब्सच्या मते, १ जून २०२३ पर्यंत, इंद्रा नूयी यांची एकूण संपत्ती ३५० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे २८९० कोटी रुपये इतकी आहे. नव्या जगातील सर्वोत्तम सीईओंमध्ये नूयी यांची गणना होते. नूयी यांच्या नेतृत्वाखाली, पेप्सीकोचा महसूल २००६ मध्ये ३५ अब्ज डॉलर होता तो २०१७ मध्ये ६३.५अब्ज डॉलर इतका झाला.