ब्रिक्स देश एकत्रितपणे जगाच्या, विशेषत: ग्लोबल साउथच्या कल्याणामध्ये महत्वाचे योगदान देतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी मंगळवारी जोहान्सबर्ग इथे ब्रिक्स व्यापार मंच नेत्यांच्या संवादात सहभागी झाले. ब्रिक्स व्यापार मंचाच्या चर्चेबद्दल नेत्यांना माहिती देण्यात आली.
सामाजिक-आर्थिक आव्हानांवर तंत्रज्ञान आधारित उपायांसह व्यापार सुलभता वाढवण्यासाठी, भारताने हाती घेतलेल्या विविध सुधारणा पंतप्रधानांनी अधोरेखित केल्या. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी ब्रिक्स व्यापार क्षेत्रातल्या नेत्यांना आमंत्रित केले. कोविडने लवचिक आणि सर्वसमावेशक पुरवठा साखळीचे महत्त्व अधोरेखित केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि यासाठी परस्पर विश्वास आणि पारदर्शकतेच्या महत्त्वावर भर दिला.