अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भंडारदरा धरण हे निसर्गाच्या कुशीत बांधण्यात आलेलं आहे. दुष्काळी भागासाठी हे धरण वरदान ठरले आहे. अम्ब्रेला फॉल, उंच दरवाजांतून वेगाने बाहेर पडणारे पाणी, तसेच नजर पोहोचेल तोपर्यंत दिसणारे पाणीच पाणी धरणाचे वैशिष्ट्य आहेत. या धरणाची वाटचाल शताब्दीपूर्तीकडे होत आहे. धरणाला 96 वर्ष पूर्ण झाली आहेत. काय आहेत धरणाचा इतिहास आणि वैशिष्ट्य पाहुयात.
उत्तर नगर जिल्ह्याला दुष्काळाचा कलंक लागलेला होता. त्यावेळच्या ब्रिटिश गव्हर्मेंटने नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा भागात डॅम बांधला. भंडारदरा धरणाला आता 96 वर्षे पूर्ण झालेले आहेत. दहा डिसेंबर 1926 साली धरणाच्या कॅनलद्वारे पाणी काढत उत्तर नगर जिल्ह्याचा दुष्काळ मिटवण्याचे काम विल्सन यांनी केले होते.
भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात करण्यात आले. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा वाळू म्हणून वापरण्यात आला. धरणासाठी तब्बल 1 कोटी 26 लाख 4 हजार 140 घनफूट बांधकाम करावयाचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर 1920 मध्ये धरणात 200 फूट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता.
नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची 250 फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची 20 फुटांनी वाढवून 270 फूट करण्यात आली. भिंतीत एकूण चार मोऱ्या असून, त्या अनुक्रमे 70 फूट, 120 फूट,170 फूट व 220 फूट अशा अंतरावर आहे. या मोऱ्यांचे अर्धा फूट जाडीचे व्यास 3 फूट पाईप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या आहेत.
71.28 मीटर भिंतीच्या तळाची रुंदी असून, माथ्यावरील रुंदी 7 मीटर आहे. जून 1926 मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च झाला होता 1 कोटी 50 लाख 83 हजार 451 रुपये. 650 फूट रुंदीचा सांडवा दक्षिण बाजूला ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली.
तत्कालीन कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल याचेच नाव धरणाच्या जलाशयाला देण्यात आले. परंतु जवळच असलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारद्रा धरण असेच नाव पडले. मात्र असे असले तरी कागदोपत्री आजही हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते. या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे चित्रच पालटले. साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्याद्वारे मिळू लागले.
भंडारदरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते. प्रवरा नदीवर आणि जमीन सपाटीपासून 150 मीटर उंचीवर आहे. हे धरण भारताच्या पश्चिम किनारपट्टी वर भंडारदरा गावात आहे. हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे. विल्सन धरणाच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते आणि प्रवरा नदीच्या पायथ्याशी मिळतो. या तलावाला लेक आर्थर हिल किंवा भंडारदरा लेक म्हणूनही ओळखले जाते.