भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार तथा माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे शुक्रवारी रात्री अकोल्यात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी गंगा देवी शर्मा, दोन मुले कृष्णा व अनुप, सूना, एक मुलगी नातवंडासह मोठा आप्त परिवार आहे. अकोल्यातून सलग २९ वर्षे त्यांनी भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डाबकी मार्गावरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सलग सहा वेळा आमदार
शर्मा यांचा जन्म २ जानेवारी १९४९ रोजी पुसद (यवतमाळ) येथे झाला होता. कर्करोगाच्या आजाराने ते मागील काही महिन्यांपासून त्रस्त होते. जवळपास १५ दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतून अकोला येथील त्यांच्या घरी आणले होते. दरम्यान शुक्रवारी रात्री प्रकृती चिंताजनक होऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या घरी हितचिंतकांची एकच गर्दी झाली होती. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी सलग सहा वेळा विजय मिळवला होता. १९९५ मध्ये ते पहिल्यांदा अकोला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. त्यानंतर १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग सहा वेळा निवडून गेले. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने ते कार्यरत होते.
मोबाईल न ठेवता लोकांची थेट आठवण ठेवणारे नेते
सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत असलेले गोवर्धन शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले एकनिष्ठ नेते होते. पक्षवाढीत आमदार शर्मा यांचा मोठा वाटा होता. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतराव देशमुख, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे ते निकटवर्तीय होते. अकोलेकरांच्या सुख-दुःखात धावून जाणारे व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. नागरिकांच्या अनेक समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असणारे आमदार शर्मा लोकांसाठी सदैव उपलब्ध असत. कधीही जवळ मोबाईल न ठेवता लोकांची थेट आठवण ठेवणारे, अशी त्यांची ओळख होती. विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे तसेच अयोध्या येथील शीला पूजन १९९५ पासून ‘श्रीराम जन्मभूमी’ आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. लोकनेते आणि राम भक्त म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
नगरसेवक कसा असावा, याचा आदर्श घालून दिला
अकोला नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती नियोजन समिती सदस्य तसेच नियोजन सभापती म्हणून त्यांनी काम केले. अकोला शहरातील पाणीटंचाई संदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. तसेच नगरसेवक कसा असावा याचा आदर्श त्यांनी उभा केला. जुन्या शहरात शैक्षणिक संस्था उभ्या करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहण्यापासून त्यांनी वाचवले. तसेच उच्च शिक्षणापर्यंतची सोय देखील त्यांनी उपलब्ध करून दिली. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सामान्य अकोलेकरांचा हक्काचा माणूस अशी त्यांची विशेष ओळख होती.