शेकडो वर्षापासून धाराशिव जिल्ह्यातील भातागळी गावात चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याला संपूर्ण गावातर्फे एकच गुढी म्हणजे महादेवाची काठी महादेव मंदीरात उभारली जाते.शंभु महादेवाची अर्धागिनी असलेल्या पार्वतीचा अवतार समजून काटीची प्रतिकात्मक प्रतिष्ठापना करण्यात येते.ही परंपरा आज ही कायम सुरु असुन रविवारी गावात ही एकच गुढी उभारण्यात आली आहे.
तेरणा नदीच्या काठावर वसलेले लोहारा तालुक्यातील भातागळी हे गाव गावात दर वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी गावात कोणाच्याच घरासमोर गुढी उभारण्याची परंपरा नाही. गावची गुढी एकच ती म्हणजे शंभो महादेवाची काठी उभारली जाते. ही काठी आज मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उभारण्यात आली. या गावातील भक्त गुढी पाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी २१ मार्चला शकडो भक्तमंडळी या महादेवाच्या काठीबरोबर पायी चालच ही शंभो महादेवाची काठी घेवून शिखर शिंगणापूरला जातात. साधारण भातागळी ते शिखर शिंगणापूर हे अंतर २५० किमीचे आहे. दररोज ४० किमीचा पायी प्रवास करत भक्त हे अंतर सहा दिवसात पूर्ण करतात. हि काठी भातागळी,लोहारा, धाराशिव ,सोलापुर,पुणे,सातारा जिल्ह्यातून शिंगणापूरला जातात.
ही काठी शिखर शिंगणापूरात मानाची काठी आहे.ही काठी परत भातागळी गावात आल्यानंतर गुढी पाडव्यानंतर येणाऱ्या पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी काठीच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव व परीसरातील भक्त मोठ्यासंख्येने हजेरी लावतात.यात महीला भक्तांची संख्या लक्षणीय असते. या दिवशी पासून मोठी यात्रा भरते ही यात्रा तीन दिवस असते.या यात्रेसाठी जे गावातील नागरीक कामधंद्यासाठी,नोकरीला बाहेर आहेत.ते गावाकडे येतात.नवस बोललेले भाविक या यात्रे दरम्यान नवस फेडतात. परीसरातील भाविक ही मोठ्याप्रमाणात यात्रेस येतात.