भारत, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांनी इंडिया स्टॅक (INDIA STACK) सामायिक करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. इंडिया स्टॅक हे खुले ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा संग्रह असून, मोठ्या प्रमाणात ओळख, डेटा आणि पेमेंट सेवा उपलब्ध करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.
क्षमता विकास, प्रशिक्षण कार्यक्रम, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, सरकारी अधिकारी आणि तज्ञांची देवाणघेवाण, प्रायोगिक अथवा प्रात्यक्षिक स्तरावरील उपाययोजनांचा विकास इ. द्वारे डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मागील आठवड्यात त्रिनिदाद आणि टोबॅगोचे डिजिटल परिवर्तन मंत्री, सिनेट सदस्य हॅसल बाकस यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा सामंजस्य करार झाला.
या भेटीदरम्यान त्यांनी माहिती तंत्रज्ञान, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि इंडिया स्टॅक या क्षेत्रातील परस्पर सहकार्यावर चर्चा केली.
इंडिया स्टॅक उपलब्ध करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, “वसुधैव कुटुंबकम” या तत्त्वावर विश्वास ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच जगभरातील देशांना, विशेषतः डिजिटलायझेशनच्या प्रयत्नांमध्ये मागे राहिलेल्या देशांना इंडिया स्टॅक उपलब्ध करायला प्रोत्साहन दिले आहे. इंडिया स्टॅकच्या मदतीने हे देश डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करतील, आणि त्यांची अर्थव्यवस्था आणि प्रशासनात परिवर्तन घडवतील.”
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग, आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.
भारताने यापूर्वीच जून 2023 पासून, इंडिया स्टॅक सामायिक करण्यासाठी आर्मेनिया, सिएरा लिओन, सुरीनाम आणि अँटिग्वा आणि बारबुडा या देशांबरोबर सामंजस्य करार केले आहेत, तर मॉरिशस, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी यामध्ये स्वारस्य दाखवले आहे आणि ते इंडिया स्टॅक बाबतच्या सहकार्याला अंतिम रूप देण्याच्या पुढील टप्प्यावर आहेत. अशाच स्वरूपाचा सामंजस्य करार गेल्या महिन्यात पापुआ न्यू गिनीबरोबरही करण्यात आला असून, तो जागतिक स्तरावर या उपक्रमाला मिळत असलेली वाढती पसंती आणि स्वीकृती दर्शवितो.
युपीआय (UPI) हा देखील भारत स्टॅकचा एक भाग असून, फ्रान्स, युएई (UAE), सिंगापूर आणि श्रीलंकेमध्ये त्याला स्वीकृती मिळाली आहे.