भारत आणि सौदी अरेबियाने रविवारी रियाध येथे वीज आंतरजोडणी, हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि पुरवठा साखळी या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले आलेले ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान अल-सौद यांनी रियाधमध्ये मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताह (MENA ) च्या निमित्ताने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
वीज आंतरजोडणी क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी एक आराखडा तयार करणे आहे; मागणी अधिक असताना आणि आपत्कालीन परिस्थितीत विजेची देवाणघेवाण; प्रकल्पांचा सह-विकास; हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जेची सह-निर्मिती ; आणि हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात वापरल्या जाणार्या सामग्रीची सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळी स्थापित करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.
ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या वर-उल्लेखित क्षेत्रांमध्ये संपूर्ण पुरवठा आणि मूल्य साखळी प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान B2B उद्योग परिषदा आणि नियमित B2B परस्परसंवाद आयोजित केले जातील असा निर्णयही दोन्ही ऊर्जा मंत्र्यांनी घेतला.
तत्पूर्वी, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने 8 ते 12 ऑक्टोबर 2023 दरम्यान सौदी अरेबियामधील रियाध येथे आयोजित मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताह 2023 च्या उच्च-स्तरीय सत्रात भाग घेतला. आज रियाधमध्ये मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताहाच्या पहिल्या दिवशी “पॅरिस कराराचे जागतिक हितधारक प्रादेशिक संवाद: महत्वाकांक्षा आणि न्याय्य आणि सर्वसमावेशक संक्रमण सक्षम करणारे तंत्रज्ञान” यावरील सत्राला संबोधित करताना केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणाले की जागतिक स्तरावर ऊर्जा उत्पादन, वापर आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी संधीचा शोध घेणे आणि सामायिक करणे यासाठी हा हवामान सप्ताह अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्यांनी जागतिक समुदायाला सांगितले की, भारत आज ऊर्जा क्षेत्रामध्ये जगातील सर्वात महत्वाच्या देशांपैकी एक आहे आणि ऊर्जा संक्रमणामध्ये एक नेतृत्व म्हणून उदयास आला आहे. “जगातील लोकसंख्येच्या जवळपास 17% लोकसंख्या असलेला आणि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत, 2030 पर्यंत उत्सर्जन तीव्रता त्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 45% नी कमी करण्यासाठी आणि 2070 पर्यंत नेट झिरो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे.” भारताच्या ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन घडले आहे, ज्याचा उद्देश जनतेला विश्वासार्ह, परवडणारी आणि शाश्वत ऊर्जा प्रदान करणे हा आहे याची त्यांनी आठवण करून दिली .
सिंह म्हणाले की, भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी हरित हायड्रोजन हा एक आश्वासक पर्याय आहे. “तुम्हाला हे सांगताना मला खूप आनंद होत आहे की भारत सरकारने हायड्रोजन उर्जेचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू केले आहे आणि या मिशनसाठी 2.3 अब्ज डॉलर्सच्या प्रारंभिक खर्चास मान्यता दिली आहे.”
आघाडीच्या पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी शाश्वत जैवइंधनामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी मध्य पूर्व उत्तर आफ्रिका देशांनी जागतिक जैव इंधन आघाडीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताहचा उद्घाटन सोहळा येथे पाहता येईल.
ग्लोबल स्टॉकटेक ऑफ पॅरिस ऍग्रीमेंट
मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिका हवामान सप्ताहातील उच्च-स्तरीय GST (ग्लोबल स्टॉकटेक ऑफ द पॅरिस करार) प्रादेशिक संवाद या प्रदेशातील प्रमुख संदेशांवर चर्चा करण्यासाठी धोरण निर्माते, प्रमुख भागधारक आणि आंतरसरकारी प्रक्रियेतील भागीदारांना फलनिष्पत्ती बाबत सहमतीसाठी एकत्र आणेल. MENA च्या संदर्भात हवामान कृती आणि मदत वाढविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्यासाठी आव्हाने, अडथळे, उपाय आणि संधी यावर चर्चा करण्यासाठी हा संवाद एक व्यासपीठ म्हणून काम करेल.