तभा वृत्तसेवा
सोलापूर दि. 3 जानेवारी-
सिद्धेश्वर साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी धर्मराज काडादी यांनी बेकायदेशीरपणे उभी केली. राज्यात भाजपची सत्ता असताना पाडकामाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. आता काडादी मोठ मोठ्या नेत्यांची नावे घेत आहेत. सहा महिन्यापूर्वी राज्यात कोणाची सत्ता होती. अडीच वर्षात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व रोहित पवार यांनी तुम्हाला चिमणीसाठी का मदत केली नाही असा सवाल आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित करून काडादी यांना भावनिक राजकारण न करता थेट मैदानात या असे खुले आव्हान दिले आहे.
बोरामणी विमानतळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर कारखान्याचे शेतकरी सभासद, कर्मचारी व हितचिंतकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चासमोर भाषण करताना काडादी यांनी आमदार देशमुख यांचे नाव न घेता आरोप केले होते. यावेळी हिवाळी अधीवेशन सुरू असल्याने आमदार देशमुख सोलापुरात नव्हते. अधिवेशन संपल्यानंतर ते सोलापुरात आले आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना काडादी यांच्या आरोपांना उत्तरे देत थेट मैदानात येण्याचे आव्हान दिले आहे.
आमदार देशमुख म्हणाले, समाजाचे आधार घेउन राजकारण करण्यापेक्षा तुम्ही मैदानातच या. मग तुमची विश्वासार्था पाहू. तुम्हाला आमदार नको असेल, खासदार नको असेल तर तुम्ही लोकांमध्ये या. लोकांमध्ये तुमची विश्वासार्हता किती आम्ही बघूच. मला निवडून देणारे काडादी किंवा रोहित पवार नाहीत. सोलापुरातील सुजाण नागरिक निवडून देणारे आहेत. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी उभी करताना महापालिकेत कोणाची सत्ता होती. तुम्ही कागदपत्रे काढून बघा. चिमणी उभी करताना काडादी यांनी मनपा, पर्यावरण विभाग, विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घेतली नाही. साधं घर बांधताना कितीतरी कागदपत्रे द्यावी लागतात. पण कारखान्याची चिमणी बेकायदा बांधली गेली. युतीचे सरकार असताना चिमणी पाडकामाचे न्यायालयाकडून आदेश आले. महापालिकेने चिमणी पाडकामाची तयारी केली होती. त्यावेळी कारखान्याचे काही संचालक, माजी मंत्री दिलीप सोपल व माझ्या पुढाकाराने बैठक लावण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमणी पाडकामाला स्टे दिला. यापुढील काळात कारखान्याने चिमणी कायदेशीर करण्याचे सोपस्कार करणे आवश्यक होते.
चिमणी विरोधात कोण गेले
चिमणीविरोधात कोर्टात कोण गेले. भाजपने कि भाजपच्या कार्यकर्त्याने चिमणी विरोधात तक्रार केली आहे का? एकतर बेकायदा चिमणी उभी केली. ती कायदेशीर करून घेण्याची जबाबदारी कोणाची. आपली चूक झाकण्यासाठी काडादी उगाच भाजपला टार्गेट करीत आहेत. तुम्ही मोठमोठ्या नेत्यांची नावे घेता मग त्यांनी तुम्हाला का मदत केली नाही असा सवाल आमदार देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
देवस्थानशी माझा नाही संबंध
देवस्थानचा माझा संबंध नाही. मी काही पंच नाही. मला माहित नाही काडादी असे का बोलले. स्वत: केलेल्या चुकांना दुसर्यांवर घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही लोकांसमोर जा, चूक कबूल करा. दुसर्यांवर चूक ढकलून यांनी मदत केली नाही असा कांगावा करू नये. चिमणीच्याबाबतीत कायदेशीर बाबी काडादींनीच निस्ताराव्यात. गेल्या अडीच वर्षात आमची (भाजपाची) सत्ता नव्हती. तुम्ही मोठ्या लोकांची नावे घेता. मग या मोठ्या लोकांनी का परमीशन काढून दिली नाही असेही आमदार देशमुख यांनी सुनावले.
ते पुन्हा आमदार झाले का
आमदार रोहित पवार यांनी सोलापुरातील आमदार खासदार बदलावेत असे भाष्य केले, याकडे लक्ष वेधल्यावर आमदार देशमुख म्हणाले, विकास कामावर आम्ही चारवेळा निवडून आलो आहे. ज्यांनी माझ्यावर तोंडसुख घेतले ते पुन्हा आमदार झाले का याचे त्यांनी आत्मचिंतन करावे. माझ्यावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. बेकायदेशीर कामाला आम्ही काय मदत करावी हे काडादी यांनीच सांगावे. उठसूट भाजपच्या आमदार, खासदारावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही स्पष्टपणे राजकारण करा. कुठला तरी भावनिक मुद्दा करत अथवा समाजाचा आधार घेउन राजकारण करण्यापेक्षा तुम्ही मैदानातच या मग तुमची विश्वासार्हता पाहू, असे आव्हान आमदार देशमुख यांनी काडादी यांना दिले आहे.
भाजप असं करीत नाही
काडादी यांनी समाजाची मागणी रेटून मंत्रीपद द्यायला लावलं असं जाहीरपणे सांगितले आहे, त्यावर तुमचं म्हणणं काय असे विचारले असता आमदार देशमुख म्हणाले, भाजप असं कोणाच्या शिफारशीवर मंत्रीपद देत नाही. मंत्रीपद मिळालं तरी मी कोणाच्या विरोधात काम केलेले नाही. आपल्या चुका झाकण्यासाठी काडादी असं काहीही बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण लोकांना सगळं माहित आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...