राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात आज, बुधवारी पहाटे 4.30 वाजता बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. हे सर्व अपघातग्रस्त गुजरातचे असून ते उत्तरप्रदेशातील मथुरेला देव दर्शनासाठी चालले होते.
गुजरातच्या भावनगरहून मथुरेला जागाणी बस डिझेल संपल्यामुळे बस एका उड्डाणपुलावर उभी होती. काही प्रवासी आणि बसचा चालक बसच्या मागच्या बाजूला येऊन थांबले होते. तेवढ्यात मागून भरधाव ट्रेलर आला आणि त्यानं बसला जोरदार धडक दिली. यामध्ये एकूण 23 जण चिरडले गेले, ज्यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लखनपूर, नदबई, हलैना, वैरथाना स्थानकातील पोलिसांसह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहचले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाक गुजरातच्या भावनगरहून बस जयपूर आणि भरतपूरमार्गे मथुरेला चालली होती.पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये 6 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी 11 जणांना मृत घोषित केले. तर 20 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.