राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीला पायबंद घालण्यासाठी दुग्धव्यवसाय मंत्री श्री.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हास्तरीय समिती गट करण्याविषयी सूचित केले होते. त्याप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले असून या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षा अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्री.दिपक खांडेकर यांनी दिली आहे.
या मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यात मे. सुशील डेअरी, विष्णू नगर, नौपाडा, ठाणे (प.) येथे अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा आडे, अन्न सुरक्षा अधिकारी रा.सि.बोडके व वैधमापन विभागाचे एस.बी.जाधव यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली.
मे.सिटी डेअरी, शॉप नं.2, पाचपाखाडी, ठाणे प. येथे अन्न सुरक्षा अधिकारी रा.धों.आकरुपे यांच्यासह रा.वि.करडक व विकास अधिकारी श्री. क्रिष्णा महाळुंगे यांनी आणि मे.विधी डेअरी, चाल नं.32, गाला नं.6, रामचंद्र नगर नं.2, वागळे इस्टेट, ठाणे (प.) येथे अन्न सुरक्षा अधिकारी आय.एन.चिलवंते व पशुसंवर्धन विभागाचे आतिश काशीद यांनी तसेच मे.मनीषा डेअरी फॉर्म, शॉप नं.19/बी, काव्या रेसिडेन्सी, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे अन्न सुरक्षा अधिकारी रा.धों.आकरुपे व वैधमापन निरीक्षक नितीन गोस्वामी यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली.
या जिल्हास्तरीय समितीत अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र हे सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्री.दिपक खांडेकर हे सदस्य सचिव आहेत. या समितीची कार्यकक्षा शासन निर्णयाप्रमाणे निश्चित करण्यात आली असून यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी धडक तपासणी मोहीम हाती घेणे, दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती/आस्थापना यांच्या विरोधात प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवून कारवाई करण्यात यावी. तसेच दूध भेसळ करणाऱ्या व्यक्तीबरोबर भेसळयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणाऱ्या व्यक्ती/आस्थापनेसही सह आरोपी करण्यात यावे, असे सूचित करण्यात आले आहे.
येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर समितीने दूध व दुग्धजन्य पदार्थ या विषयाकडे अतिशय गांभीर्याने पहावे. दोषी दुकानदार/ व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जनतेला भेसळमुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळणे, ही आपली जबाबदारी आहे, असे दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यस्तरीय बैठकीत सूचना दिल्या होत्या.
या दृष्टीने ठाणे जिल्हास्तरीय समितीने धडक कारवाई सुरू केली असून विभागातर्फे जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे की, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत भेसळ आढळल्यास संबंधित व्यक्ती /आस्थापना विरोधात तात्काळ एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल.
तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत भेसळ आढळल्यास तात्काळ या समितीकडे तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.