महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये 19 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासोबत इतर दहा जण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले होते. त्यांच्या समर्थनासाठी मराठा समाजाचे इतर नागरिक देखील तिथे एकत्र आले होते.उपोषणस्थळी कार्यकर्त्यांची प्रकृती खालावलेली असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला मात्र उपोषण करणाऱ्या व्यक्तींनी पोलिसांचा हा दावा फेटाळलेला असून केवळ आंदोलन मोडीत काढण्यासाठी आम्हाला रुग्णालयात ऍडमिट करण्याचा घाट रचलेला होता असे म्हटले आहे. पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज पोलिसांनी केलेला असून पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला. शिंदे फडणवीस सरकारने याआधी आळंदीत वारकऱ्यांना मारहाण केली होती त्यानंतर मराठा आंदोलकांवर देखील लाठीचार्ज केल्यानंतर सरकारच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट पसरलेली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शांततामय मार्गाने उपोषणाला बसणाऱ्या व्यक्तींना प्रकृतीचे कारण दाखवत सरळ रुग्णालयाचे रस्ते दाखवले जात असून संपूर्ण महाराष्ट्रात असेच चित्र आहे. शासकीय यंत्रणेला शांततामय उपोषणाचा एवढा धसका घेण्याचे कारण काय ? असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला त्यानंतर पोलिसांवर देखील दगडफेक झाल्याची घटना घडलेली आहे. काही ठिकाणी एसटी बस जाळण्याच्या घटना घडलेल्या असून सरकारी संपत्तीचे नुकसान नक्की कुणी केलेले आहे ? याचाही पोलीस शोध घेत आहेत.
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज बीड शहरात बंदची हाक देण्यात आलेली असून यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देखील निवेदन देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाठीचार्ज झाल्याचा प्रकार दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिलेली असून सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे सर्वांनी शांतता राखावी , असे आवाहन केलेले आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवून या घटनेचा संपूर्ण राज्यात निषेध केला जात असून मराठा समाजाच्या भावनांशी सरकारने खेळू नये असे भावनिक आवाहन समाजाकडून करण्यात आलेले आहे.
आत्तापर्यंत शांततामय मार्गाने मराठा समाजाने सर्वच समुदायाला आदर्शवत असे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन उभे केलेले होते . हिंसात्मक मार्गाने आंदोलन करण्यास समाजाने कधीही सकारात्मकता दाखवलेली नाही त्यामुळे जालना येथील घटनेत नक्की काय घडलं आहे की केवळ काही विघ्नसंतोषी लोकांना पुढे करून आंदोलनच बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे याविषयी देखील सोशल मीडियात चर्चा सुरू झालेली आहे. कथित आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत बारा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती असून घटनेची चौकशी केली जाईल असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे.