तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम ठरली असून, महिलांच्या सहभागामुळे बचाव कार्य अधिक प्रभावी आणि समावेशक होणार आहे.
महिलांच्या बचावासाठी महिलाच पुढे
पंढरपूरच्या एकादशीच्या काळात वारकरी महिलांचे नदीत वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. अशा वेळी बचाव कार्यात पुरुषांना मर्यादा येतात. ही गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने महिलांची स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्याचा निर्णय घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
बारा दिवसीय प्रशिक्षणात जीवनरक्षक कौशल्यांचा समावेश
महिला रेस्क्यू टीमला इंडियन रेस्क्यू अकॅडमीच्या प्रशिक्षकांकडून सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये आपत्तीची ओळख, CPR, स्ट्रेचर तयार करणे, प्राथमिक उपचार, बोट हाताळणी, दोरीचा वापर, गर्दी नियंत्रण, प्रशासनाशी समन्वय अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
प्रशिक्षण विजापूर रोडवरील महाराष्ट्र एज्युकेशन हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात तर प्रात्यक्षिके हिप्परगा तलाव येथे घेतली जात आहेत.