महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योगांना बसला आहे. या संपामुळं शहरातील 12 हजार पैकी जवळपास दीड हजार लघुउद्योग ठप्प झाले आहेत. काही दिवसांपूर्वी इथली बत्ती गुल झाली होती. तेव्हा एका दिवसात शंभर कोटींचा फटका बसला होता. हा विचार करूनच इथले लघुउद्योग चिंतेत आहेत.
धुळे जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात प्राध्यापक शरद पाटील त्या सर्व शिवसैनिकांनी सहभागी होत शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणा विरोधात घोषणा दिल्या.
खासगीकरणाच्या विरोधात भंडारा आणि गोंदियातील महावितरणचे कर्मचारी संपात उतरले आहेत. भंडारा आणि गोंदिया येथील कर्मचाऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली. भंडारा येथील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी भंडारा शहरातील मुख्य मार्गाने बाईक रॅली काढत खासगीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
नांदेड जिल्ह्यातील 142 सबस्टेशनच्या 1 हजार 700 महावितरण कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. अदानी समूहास महावीतरणचे समभाग देऊन खासगीकरण करण्याला कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. येत्या 72 तासात राज्य सरकारनं या संपावर सकारात्मक भूमिका न घेतल्यास 18 जानेवारीपासून बेमुदत संपावर जाऊ असा इशारा या संपात सहभागी झालेल्या 31 संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.