मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर येत असून, मुंबईमध्ये तीन दहशतवादी आल्याची माहिती देणारा फोन कॉल मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. दुबईवरुन शुक्रवारी (7 एप्रिल) पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आल्याचं आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा कॉलरने दावा केला आहे. या फोन कॉलने मोठी खळबळ उडाली असून, मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत. तर पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आला आहे. दुबईवरुन शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी आल्याचे आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. तर एकाचे नाव मुजीब सय्यद असून त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर देखील पोलिसांना संबंधित कॉलरकडून देण्यात आला आहे. तसेच या तीनही व्यक्तींचा दोन नंबरचा धंदा असल्याचा दावाही कॉलरने केला आहे. त्यामुळे पोलिसांकडून या संबंधी चौकशी करण्यात येत आहे.