राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांना प्रवासादरम्यान शिवीगाळ आणि धमकी देत कॅबमधून बाहेर काढल्याबद्दल अटक करण्यात आली. इरफान अली असे आरोपीचे नाव असून त्याला मानखुर्द येथील त्याच्या घरून अटक करण्यात आलीय.
यासंदर्भातील माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातील आमदार राजू कारेमोरे यांनी मुंबई विमानतळाहून आकाशवाणी आमदार निवासात जाण्यासाठी कॅब बुक केली होती. मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या आमदार निवासात जाण्यासाठी विमानतळाहून वांद्रे-वरळी सी-लिंक हा सोईस्कर मार्ग आहे. परंतु, याठिकाणी टोल नाका असल्यामुळे कॅबचालकाने अन्य मार्गाने वाहन नेण्याचा प्रयत्न केला. टोलचे पैसे वाचवण्यासाठी कॅबचालक वाहन दुसऱ्या रस्त्याने नेऊन आमदारांचे बिल वाढवण्याचा प्रयत्नात होता. त्याची चलाखी ओळखून आ. राजू कारेमोरे यांनी कॅब चालकाला गाडी वांद्रे-वरळी सी लिंकवरून नेण्याची सूचना केली.
आपण आमदार असल्यामुळे तुझ्या वाहनाला टोल टॅक्स लागणार नाही असे देखील त्यांनी कॅब चालकाला समजावून सांगितले. परंतु, कॅब चालक काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने आमदार कारेमोरे यांना शिविगाळ करत धमकावणे सुरू केले. तसेच वाकोला जंक्शनवर पोहोचल्यावर धमकी देत कारेमोरे यांना कॅबमधून खाली उतरण्यास भाग पाडले. या घटनेनंतर आमदारांनी ओला टॅक्सी कंपनीकडे तक्रार केली तसेच दुसरी कॅब बुक करत गंतव्याला पोहचले. याप्रकरणी आमदार कारेमोरे यांनी वाकोला पोलिसात देखील तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी कॅबचालकाला त्याच्या मानखुर्द येथील घरातून अटक केली आहे.