कथित जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सुजित पाटकर यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सुजित पाटकर हे लाईफलाइन हॉस्पिटलच्या भागीदारांपैकी एक असून त्यांना कोविड हॉस्पिटलचे कंत्राट मुंबई महापालिकेकडून देण्यात आले होते. त्यांना गुरुवारी (१७ ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची आर्थिक गुन्हे विभागाची (ईओडब्ल्यू) कोठडी सुनावली आहे.
सुजित पाटकर यांच्यासह डॉ. किशोर बिसुरे यांना देखील गेल्या महिन्यात सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली होती. पाटकर हे ईडी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होते. पण आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमधून ईओडब्ल्यू कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय नेत्यांचा देखील सहभाग असल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, ईडीनंतर आता आर्थिक गुन्हे शाखा पाटकर यांचा तपास करणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कोविड काळात झालेल्या घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध विभागातील अधिकाऱ्यांची आता एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
काय आहे घोटाळा
कोविड काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग्स या अतिरिक्त दरात खरेदी करण्यात आल्याचे अहवालातून समोर आले आहे. या बॅगची किंमत ही जवळपास १,८०० ते २,००० रुपये इतकी असताना मुंबई महापालिकेने या बॅग ६,८०० रुपये किंमतीने खरेदी केल्या. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरून बॉडी बॅग खरेदीचे कंत्राट देण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.