पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकीला मुंबई विद्यापीठाने पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र या स्थगितीमुळे राजकीय पक्षांसोबतच विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली. मात्र या निर्णयामागील माहिती परिपत्रकात दिलेली नाही. त्यामुळे या निर्णयावरून चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच ९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार १० सप्टेंबर रोजी मतदान आणि १३ सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र अचानक सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विद्यापीठाकडून परिपत्रकही जाहीर करण्यात आले.
संघटनांकडून नाराजीचा सूर
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक असल्याची टीका ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केली आहे.
अखेर राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले त्याचा आम्ही युवासेना तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, अशी प्रतिक्रिया युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केली.
सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षांच्या युवा आघाडी आणि विद्यार्थी आघाडीची तयारी नसल्यामुळे आणि या निवडणुकीमध्ये आपला पराभव हा निश्चित होणार आहे, हे लक्षात आल्याने भाजप आणि शिंदे गटाने हा रडीचा डाव खेळला असल्याचा आरोप छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी केला आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून अचानक त्याला स्थगिती देण्यात येते, हे आश्चर्यकारक आहे. सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्तीचा जाहीर निषेध. मुंबई विद्यापीठावर नेमका कोणाचा दबाव आहे? याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. येत्या सात दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा. अन्यथा कुलगुरूंना घेराव घालू, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिला.