बारामती : अगदी लहानपणापासूनच मेंढ्यांच्या मागे काठी घेऊन धावणारी मेंढपाळाची लेक रेश्मा आता थेट भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार झाली आहे. काठीने दगड मारण्याचा खेळ खेळणं, दगड हातात घेऊन पीचींग करणं, हुंदडणं पण त्याच काठीच्या आकाराची स्लगर कधी भारतीय संघाचा खेळाडू नव्हे तर थेट भारतीय संघाचा कर्णधार बनवेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, अशी प्रतक्रिया रेश्मा पुणेकरने व्यक्त केली. ही गोष्ट आहे बारामती तालुक्यातील पवारवाडी या दुष्काळी पट्ट्यातील मेंढपाळाच्या लेकीच्या संघर्षाची आहे. या संघर्षाने आजपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने, चीन आणि हाँगकाँग या देशात खेळले आहेत, तर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २३ राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व केलेलं आहे.
२८ राज्यस्तरीय सामने तसंच ४ गोल्ड, ६ रजत, ३ कास्य पदक आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार मिळवला आहे. सर्वात शेवटचं ध्येय भारतीय संघाचं नेतृत्व करणं हे होतं. हॉंगकॉंग, चिन सारख्या बाहेरील देशात जाऊन दोन वेळा आशियाई स्पर्धा खेळून आलेली रेश्मा पुन्हा एकदा हॉंगकॉंग सारख्या देशात होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला आशिया कप २०२३ या स्पर्धेत कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे. रेश्मा बारामतीच्या नेहमीच जिरायती आणि दुष्काळी भागात जन्माला येऊन आर्थिक परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभं राहून स्वतःची ओळख निर्माण करणारी एक संघर्षशील, धैयशिल, कृतिशील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.
रेश्मा शिवाजी पुणेकरने आज तिच्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळवलं आहे. असं असूनही तिच्यासमोर कठीण परिस्थिती उभी आहे. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी लागणाऱ्या खर्चासाठी तिच्याकडे पुरेसं आर्थिक पाठबळ नाही. रेश्मा सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शारिरीक शिक्षण विभागात एम. पी. एड या वर्गात शिक्षण घेत आहे. रेश्माला आतापर्यंत मिळालेले मेडल, प्रमाणपहीत्रं ठेवण्यासाठी तिच्याकडे एखादं कपाटही नाही. तसंच तिच्याकडे कोणतीही आधुनिक उपकरणं, साहित्य नाही. रेश्माकडे दोन जोडी बैल आहेत. तिचे आई-वडील शेतात रात्रंदिवस काम करतात. मुलीच्या खेळासाठी त्यांनी बकरी विकली, स्वत:चं शेतही विकलं, पण आजही तिची परिस्थिती काळ बनून तिच्यासमोर उभी आहे.
रेश्माच्या खेळरुपी पंखांना बळ देण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ती महाराष्ट्राचंच नाही, तर देशाचं नाव उंचावेल यात शंका नाही. येणाऱ्या काळात तिच्या आहारासाठी, खेळण्याच्या साहित्यासाठी आणि इतर लागणारा खर्च तिला पेलवणारा नाही. त्यामुळेच समाजातील दानशूरांना रेश्मा पुणेकर मदतीचं आव्हान करत आहे.