पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह २० जणांवर या हत्येचा आरोप होता. हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं होतं.
पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मोहसीन शेखची २ जून २०१४ रोजी जमावाने हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह २० जणांना पोलिसांनी येरवड्यातून अटक केली होती.
मोहसीन शेख हा तरुण एका आयटी कंपनीत काम करत होता. तो मूळचा सोलापूरचा होता. मात्र, तो कामासाठी पुण्यात स्थायिक झाला होता. पण पुणे येथील हडपसरमध्ये २ जून २०१४ ला दंगल उसळली होती. या दंगलीत मोहसीनचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर मोहसीनचा भाऊ मोबीन मोहंमद सादीक शेख याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह २० जणांना अटक केली होती. महापुरुषांबाबत वादग्रस्त पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ही दंगल उसळली होती.
हिंदू राष्ट्र सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मोहसीनला मारहाण केली होती. या मारहाणीत मोहसीनचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणामध्ये पुणे सत्र न्यायालयाने हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईसह २० जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.