रत्नागिरी, 4 ऑगस्ट, (हिं. स.) : अधिक मासानिमित्ताने तीस तीन म्हणजेच तेहतीस घरी जाऊन झाडाचे एक रोप देऊन तेथे वृक्ष वाढदिवस साजरा करा. म्हणजेच वृक्ष संवर्धनाचे महत्त्व घरोघरी पटेल, असे विवेचन पर्यावरण प्रेमी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत परांजपे यांनी केले.
दापोली ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दर महिन्याच्या अखेरीला नामांकित वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन पेन्शनर सभागृहात करण्यात येते. त्यानुसार “सुगंध वसुंधरेचा” या विषयावरील व्याख्यानासाठी परांजपे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अधिकमासाचे महत्त्व वेगळ्या पद्धतीने विशद केले. माता, जननी ही आपल्याला जन्म देणारी आणि धरित्री ही पोषण करणारी माता जननी आहे. या दोन्ही मातांचा वारंवार होणारा अपमान टाळण्यासाठी कटिबद्ध होण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनातील विविध कंगोरे विशद करताना अनेक दाखले या प्रसंगी त्यांनी दिले. समारंभाला मुसळधार पावसातही ज्येष्ठ नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
प्रशांत परांजपे यांच्या पर्यावरण संवर्धन, साहित्य, पर्यटन आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांचा विशेष सन्मान गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
संघटनेच्या सदस्यांपैकी त्या महिन्यात असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे केले जातात. अनंत शिंदे, वसंत जाधव, सदानंद पित्रे, हसमुख पांगारकर, मंगल सणस, प्रीती ओक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान परांजपे यांच्या हस्ते पुष्प आणि श्रीफळ देऊन करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश बेर्डे, प्रेमानंद महाकाळ, राधारमण बुटाला, उल्हास सांवत, रमेश जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रा. अशोक निर्बाण, कवयित्री रेखा जेगरकल, बाळकृष्ण पाठक या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.